IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; पहा कोणत्या नवीन चेहऱ्यांना देण्यात आली संधी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंड हा भारताबरोबरच्या दौऱ्यावर आहे. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यात खेळवण्यात येणार आहे.या मालिकेला २३ मार्चला सुरुवात होणार आहे. हे वनडे सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी होणार आहेत. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे तर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यावेळी सलामीसाठी रोहितबरोबर शिखर धवन हा पर्याय असेल, पण त्याचबरोबर युवा सलामीवीर शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत गिलला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, असे समजत आहे.

भारताकडे मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर आहे तसेच या संघात सूर्यकुमार यादवला देखील स्थान देण्यात आले आहे. तसेच हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांनाही यावेळी संधी देण्यात आली आहे. तसेच या संघात लोकेश राहुलचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारताच्या गोलंदाजीमध्ये प्रसिध कृष्णन या युवा गोलंदाजाला प्रथमच संधी देण्यात आली आहे. प्रसिध कृष्णन हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. तसेच अष्टपैलू कृणाल पंड्याचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. फिरकीपटू अक्षर पटेलला या संघात स्थान देण्यात आले नाही. तसेच रवींद्र जडेजा अजूनही दुखआपतीमधून सावरलेला नाही म्हणून संघात एक डावखुरा फिरकीपटू असावा, म्हणून कृणाल पंड्याला भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

या संघामध्ये फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या या खेळाडूंवर असणार आहे. तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी. नटराजन आणि प्रसिध कृष्णन यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. तसेच या संघात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना यावेळी विश्रांती देण्यात आली आहे.

असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर.