बेन स्टोक्सचा खुलासा – सामन्यापूर्वी महिला डियोड्रंटचा वापर करतात इंग्लडचे खेळाडू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सने इंग्लंड संघातील खेळाडूंविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, इंग्लंडचे खेळाडू सामन्यापूर्वी महिलांचा डियोड्रंट वापरतात. दरम्यान, स्टोक्सने यामागील कारण देखील स्पष्ट केले आहे. स्टोक्स म्हणाला की, महिला वापरत असलेले डियोड्रंट्स पुरुषांपेक्षा अधिक सुगंध देतात. म्हणूनच इंग्लंडचे खेळाडू त्याचा वापर करतात. तसेच, या इंग्लंडच्या ऑलराउंडरला डाळिंबाच्या सुगंधाचा डियोड्रंट जास्त आवडत असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने 52 चेंडूत 99 धावा केल्या. त्याने जॉनी बेअरस्टोबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 6 गडी गमावून 336 धावा केल्या. इंग्लंडने 43.3 षटकांत 4 गडी गमावून 337 धावांचे लक्ष्य गाठले. त्याचबरोबर सामना संपल्यानंतर बेन स्टोक्सने म्हटले की, संघाच्या निर्भयतेमुळे दुसर्‍या वनडे सामन्यात भारताला पराभूत करण्यात मदत झाली. पहिल्या सामन्याच्या तुलनेत ही चांगली विकेट असल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही वर्षांपासून आम्ही मोठी – मोठी उद्दिष्टे साध्य केली आहेत. खरे सांगायचे तर आपल्याला कोणत्याही ध्येयाची भीती वाटत नाही.

इंग्लंडच्या या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी झाली आहे. मालिकेचा पहिला सामना भारतीय संघाने 66 धावांनी जिंकला. तिसरा सामना पुण्यात 28 मार्च रोजी खेळला जाईल. या सामन्यात विजयासह भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. संघाने यापूर्वीच कसोटी आणि टी -20 मालिका आपल्या नावे केेली आहे.