राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी साकारली भारतीय संविधानाची थ्री डी रांगोळी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची थ्रीडी रांगोळी साकारली. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी या रांगोळीची पाहणी करून मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या 13 विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.संजय चाकणे, प्रा.विशाल मोरे, प्रा.फिरोज शेख, प्रा.दर्शन दळवी, प्रा.नामदेव पवार, प्रा.मयूर मखरे, श्री.प्रदीप ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 7 तास अथक प्रयत्न करून भारतीय संविधानाची थ्री डी रांगोळी साकारली आहे.

भारताचा नकाशा काढून त्यामध्ये संविधानाची थ्रीडी आकृती काढून त्याद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांचा संदेश देण्यात आलेला आहे. या रांगोळीचे विशेष म्हणजे ती मातीकामातून काढलेली आहे. या माध्यमातून रक्तदान, लोकसंख्या नियंत्रण, पाणी वाचवा, सदृढ भारत, पल्स पोलिओ, स्वच्छ भारत असे विविध संदेश थ्रीडी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या रांगोळीतुन भगवान गौतम बुद्ध यांचा अत्त दीप: भव। हा संदेश दिलेला आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची संपूर्ण पार्श्वभूमी पाहिली असता निश्चितपणाने युवकांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर मुकुंद शहा म्हणाले की, ‘संविधानाची शपथ प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणली पाहिजे. आपल्या रोजच्या जीवनात स्वच्छतेचे अधिक महत्त्व दिले पाहिजे.

प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून महाविद्यालयातील विविध उल्लेखनीय घडामोडींची माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, डॉ. भिमाजी भोर, डॉ. शिवाजी वीर, प्रा. बापू घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख यांनी केले. क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी आभार मानले.