इंदापूर : तब्बल 20 तासानंतर 7 जणांची पुराच्या पाण्यातुन सुटका

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील नीरा नदीतील पुराच्या पाण्याने घराला वेढा टाकल्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोरे कुटुंबातील सात जणांची सुटका इंदापूर महसुल आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या टीमने तब्बल वीस तासांनी केल्याने परीसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बुधवार दिनांक १४ आक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निमसाखर येथील अविनाश मोरे यांचे शेतीतील राहते घराला निरा नदीच्या पुराच्या पाण्याने चोहोबाजुनी वेढा दील्याने मोरे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. सायंकाळची वेळ असल्याने कोणतीही आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्याने मोरे कुटुंबातील सातजणांना बुधवारची अख्खी रात्र पाण्याच्या वेढ्यातच काढावी लागली.

गुरूवार दिनांक १५ रोजी सकाळपासुन मोरे कुटुंबाची पाण्यातुन सुटका करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला होता. इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांना घटनेची खबर देण्यात आल्याने तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी पाठवुन दीले.सदर पथकाने एक तासाच्या परीश्रमानंतर मोरे कुटुंबातील सातजणांची सुखरूप सुटका गुरूवारी दुपारी एक वाजता केली.

आपत्ती व्यवस्थापन पथकातील सेवानिवत्त तलाठी मदन भिसे,पडस्थळ पोलीस पाटील सुनिल राऊत, सुगाव पोलीस पाटील अरूण कांबळे, अमोल भिसे यांचे पथकाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोरे कुटुंबाला शर्थीचे प्रयत्न करून बाहे काढण्यात यश मीळविले.तर अविनाश मोरे,ज्योती मोरे,गणेश मोरे,अणुजा मोरे,बापु मोरे, भिकोबा रणवरे व त्यांच्या पत्नी असे एकुण सात जणांची सुटका करण्यात आली. यावेळी आपत्त्ती व्यवस्थापन पथकाला निमसाखर येथील ग्रामस्थ अभिजित रणवरे, बाळासाहेब रणवरे, रंजीत रणवरे, विरसिंह रणसिंग, नंदकुमार रणवरे, शेखर पानसरे, गणेश सुतार, विशाल रणवरे यांनी मोलाचे सहकार्य केले व मोरे कुटुंबाची पुराच्या पाण्यातुन सुखरूप सुटका केली.