इंदापूर : नगरपरिषदेकडून सिंगलयुज प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती रॅली

इंदापूर :पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरात इंदापूर नगरपरिषद, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान, आय.टी.आय., श्री. नारायणदास रामदास हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल युज प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली.

१ मे २०२० रोजी महाराष्ट्र स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने शासनाने राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका यांना सिंगल युज प्लास्टिक मुक्त करणेबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार इंदापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्लास्टिक वेचा मोहीम इंदापूर नगरपालिकेने राबविले आहे. १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील शाळा, बाजारपेठ, व्यवसायिक क्षेत्रे याठिकाणी नगरपरिषदेने सिंगल युज प्लास्टिक कचरा मुक्ती साठी जनजागृती करून प्लास्टिक कचरा गोळा केला. शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन यांची याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे देखील आयोजन केले होते.

इंदापूरचे नागरिक, स्वयंसेवी संस्था नेहमीच नगरपरिषदेच्या वेगवगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतात. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूर शहर सक्रिय सहभागी झाले. नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.