मारहाण करून जमीन बळकावणार्‍यांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बाभुळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – मौजे हिंगणगाव (तालुका इंदापूर) येथे बांधाशेजारी असलेली शेतजमीन गुंडागर्दी व दहशतीच्या जोरावर बळजबरीने बळकावण्याच्या हेतुने महिला व तिच्या नातेवाइकास लोखंडी राॅडने बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून जखमी केल्याप्रकरणी, पुजा महाविर जगताप (रा. हिंगणगाव) या पिडीत महिलेने युवराज सोपान पवार व पप्पु सोपान पवार यांचेसह पाच अनोळखी इसम सर्व रा. इंदापूर यांचे विरोधात इंदापूर पोलीसात फिर्याद दिली असुन आरोपीवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा (अट्राॅसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पिडीत महिला पुजा महाविर जगताप (वय ३४) मुळ. रा. हिंगणगाव, ता.इंदापूर, जि. पूणे व सध्या रा. टेंभाडे पालघर ( लक्ष्मी काँम्प्लेक्स,फ्लॅट नं.१०४) ता. जि. पालघर यांनी वरील आरोपींविरोधात इंदापूर पोलीसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की पुजा जगताप ह्या दि. ८ मार्च २०२० रोजी पालघर येथुन एकट्याच त्यांचे मुळ गावी हिंगणगाव याठीकाणी होळीनिमित्त आल्या होत्या. दि. १२ मार्च रोजी फिर्यादी यांचे भाऊ किशोर अशोक धाईंजे, भावजय सुकण्या धाईंजे, मामाचा मुलगा अनमोल बनसोडे, चुलत भावाची मुले रजत सत्यवान धाईंजे व सत्यवान धाईंजे यांचेसह इतर नातेवाइक त्यांना भेटण्यासाठी हिंगणगाव येथील घरी आले होते.

त्याच दिवशी दुपारी दीड वाजणेच्या सुमारास फिर्यादी महिला व त्यांचे नातेवाईक हे फीर्यादी यांचे मालकीचे शेतात झाडाखाली बसले होते. त्या वेळी फिर्यादी यांचे शेताचे बांधकरी असलेले युवराज सोपान पवार व त्याचा भाऊ पप्पु सोपान पवार व इतर पाच अनोळखी साथीदार हे एक्सयुव्ही, एम.एच. ०३, बी.एच.२९३१ या गाडीतुन हातात लोखंडी राॅड घेवुन फिर्यादी बसलेल्या ठीकाणी आले व दहशत निर्माण करत तुम्ही इथे कशाला आलाय, हे शेत आमचे आहे, तुम्हाला माहीत आहे का आम्ही कोण आहोत, पाहीजे तर इंदापूरला जाऊन चौकशी करा, मग आमच्या नादाला लागा अशी धमकी व दमदाटी करू लागले. यावेळी युवराज पवार व पप्पु पवार यांनी हातात लोखडी राॅड घेवुन फिर्यादीस जातीवाचक शिविगाळ देत फिर्यादीस मारण्यासाठी अंगावर धावुन आले.

यावेळी युवराज पवार याने फिर्यादी महीलेचा भाचा रजत सत्यवान धाईंजे याचे डोक्यात लोखंडी राॅड मारून जखमी केले. तर पप्पु पवार याने फिर्यादी पुजा जगताप यांचे डावे हाताच्या दंडावर, पायाच्या दोन्ही मांड्यावर, लोखंडी राॅडने बेदम मारहाण केली व फिर्यादीचे सासुला ढकलुन देत हाताने मारहाण केली. त्यातील एका अनोळखी आरोपीने फिर्यादींच्या गळ्यातील चैन हिसकावुन घेतली व सर्वांना शेतातुन दमदाटी करत बाहेर हाकलून लावत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याबाबतची फिर्याद पिडीत महीला पुजा महाविर जगताप (रा. हिंगणगाव) यांनी इंदापूर पोलीसात दिली असुन वरील सर्व आरोपींविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा (अट्राॅसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर हे करत आहेत.