Indapur News : चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  शेतजमिनीच्या वटणीच्या वादातून पुतण्यानेच आपल्या चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडली आहे. पुतण्याने रागाच्या भरात आशाबाई साहेबराव भोसले यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. यात गंभीर जखमी झालेल्या आशाबाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

साहेबराव भोसले यांचे कुटुंब आणि त्यांचा भाऊ विठ्ठल भोसले हे एकाच गावात राहतात. साहेबराव भोसले यांनी काटी गावच्या काटेश्वर देवस्थानची जमीन करार पद्धतीने कसण्यासाठी घेतली आहे. त्या जमिनीचा साहेबराव भोसले आमि काटेश्वर देवस्थान यांच्यातील वाद तहसीलदार यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, विठ्ठल भोसले याने या जमिनीचा वाटा मागितला. मात्र साहेबराव यांनी कोर्टात झालेला खर्च मागितला. रविवारी विठ्ठल भोसले यांचा मुलगा आणि साहेबराव यांच्या मुलात शेतातून दुचाकी घेऊन जाण्यावरुन वाद झाला होता.

रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी स्वप्निल उर्फ योगेश विठ्ठल भोसले, विठ्ठल महादेव भोसले, लक्ष्मी विठ्ठल भोसले हे साहेबराव भोसलेच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या जमीनीच्या वादातून जोरदार भांडण झाले. आम्हाला जमीन वाटून द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी स्वप्निल याने हातातील कुऱ्हाडीने आशाबाई यांच्या डोक्यात घाव घातला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आशाबाई यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.