इंदापूर : बनावट रेमडेसिविर प्रकरणी डॉक्टर गजाआड, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट रेमडेसिविर बनविणा-या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भवानीनगर (ता.इंदापुर) येथील डॉक्टरला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये डॉक्टरचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. स्वप्निल अंकुश नरुटे (वय 29, रा. काझड, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. आरोपी नरूटे हा या टोळीकडून इंजेक्शन घेऊन ती विकण्याच्या बदल्यात 3 हजार रुपयांचे कमिशन घेत होता. कमिशन पोटी त्याने घेतलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

पोलिसांनी गेल्या महिन्यात बनावट रेमडेसिविर तयार करुन विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती. कोरोना काळात रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने या टोळीने पॅरासिटोमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून 30 ते 35 हजारांना विकण्याचा धंदा सुरु केला होता, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधवचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी) संदीप संजय गायकवाड (रा. कसबा), दयानंद उद्धव गोसावी व कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, बारामती) यांच्यासह डॉ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.