पूरग्रस्त भागातील स्वच्छतेसाठी इंदापूर नगरपरिषदेचा हातभार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने एक कॅम्पेक्टर गाडी व एक अग्निशामक गाडी पाठवून तेथील भागातील स्वच्छता मोहीम हाती घेतल्याची माहिती इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इंदापूर येथे दिली.

इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी मोहन शिंदे,पोपट भंडारी,संतोष सूर्यवंशी, भागवत जाधव, दशरथ क्षिरसागर यांचे पथकाने पुरग्रस्त भागात जावुन स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन एक लाख १६ हजार ८८२ रूपये निधीचा चेक नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे नुकताच सुपूर्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक मदती बरोबरच स्वच्छतेच्या श्रमदानाचे सहकार्य व्हावे. या उद्देशाने नगरपालिकेने एक कॅम्पेक्टर व अग्निशामक गाडी त्या भागामध्ये पाठवून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये २०१८-१९ या स्पर्धेत देशात सर्वोत्तम कामगिरी करत शहरात स्वच्छतेची चळवळ उभारली आहे. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदेचे कर्मचारी व शहरातील नागरिकांच्या वतीने एक युनिट देखील या भागातील एक गाव स्वच्छ करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –