इंदापूर : दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील यांचं 55 व्या वर्षी निधन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   इंदापूर तालुक्यातील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन मंगेश वामनराव पाटील (वय 55 ) यांचे गुरुवारी (दि. 15) सकाळी निधन झाले. पाटील यांना मंगळवारी (दि.13) हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना अकलूज येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज सकाळी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने निकटवर्तीयांना धक्का बसला आहे.

माजी सहकारमंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून मंगेश पाटील यांची ओळख होती. तालुक्यातील गंगावळण या छोट्याशा गावचे रहिवासी असलेल्या पाटील यांनी अल्प काळात तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. राज्य सहकारी संघाच्या तज्ञ संचालक पदावर ते कार्यरत होते. हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. तालुक्यातील सहकारी क्षेत्रातील विविध पदे त्यांनी भूषवली होती.