इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार करणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार करणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार इंदापूर शहरात घडला आहे. 11 जणांनी चौघांना मारहाण केली आहे. घराच्या समोर मूल क्रिकेट खेळतात त्याचा त्रास होत असल्याची या कुटुंबाने भरणे यांच्याकडे केली होती. इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात ही घटना रविवारी घडली आहे.

याप्रकरणी विकास भीमराव गायकवाड (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. तर रणजीत देविदास चंदनशिवे, आनंद सर्जेराव चंदनशिवे, तुषार उर्फ बबलू पांडुरंग चंदनशिवे, सुरज विजय चंदनशिवे, अनिल उत्तम चंदनशिवे, उत्तम सदाशिव चंदनशिवे, नितीन उत्तम चंदनशिवे, नितीन सुरेश चंदनशिवे, सुनंदा उत्तम चंदनशिवे, शुभांगी अनिल चंदनशिवे आणि पियू नितीन चंदनशिवे यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वडापुरी गावात फिर्यादी आणि आरोपी राहतात. फिर्यादी यांच्या घरासमोर असलेल्या श्रीनाथ विद्यालयाच्या मैदानावर गावातील मुले क्रिकेट खेळतात. त्याचा त्रास स्त्रियांना होतो अशी तक्रार फिर्यादी यांच्या घरातील महिलांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी रविवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या घरातील इतर सदस्यांना क्रिकेटच्या स्टम्पने, दगड विटांनी, हाताने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या बोटातील अंगठी आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कुठेतरी पडून गहाळ झाले आहे. अधिक तपास इंदापूर पोलिस करत आहेत. दरम्यान याप्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत.