स्वच्छ सर्वेक्षणात इंदापूर नगरपरिषद देशात १० व्या क्रमांकावर ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरपरिषदेचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने राबविलेल्या २०१९ F स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत इंदापूर नगर परिषदेने राष्ट्रीय पातळीवर १० वा क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केल्याने इंदापूर नगरपरिषद प्रशासनाचा नागरी सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मनीषा म्हैसकर, नगरपरिषद प्रशासनाचे संचालक राधाकृष्ण मूर्ती इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, आरोग्य सभापती राजश्री अशोक मखरे, गटनेता कैलास कदम यांनी हा सन्मान मुंबई, नरिमन पाॅईंट येथील जमशेदबाबा थियटरमध्ये आयोजित खास कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्विकारला. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक पोपट शिंदे, नितीन मखरे, अशोक मखरे, रमेश धोत्रे उपस्थित होते.

इंदापूर नगरपरिषदेने घरोघरी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्याचे संकलन केले. शहर कचराकुंड्या मुक्त केले. शहरातील नागरिकांनी जादुई टोकरीचा वापर केला. नगरपरिषदेने ओल्या कचऱ्यापासून खतांची निर्मिती करून महाराष्ट्र शासनाचे हरित ब्रँड प्राप्त केले. शाळा, महाविद्यालय तसेच शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ निर्माण केली. स्वच्छता ॲपद्वारे जनजागृती केली. टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करीत लघु वनस्पती प्रकल्प शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयाचे सुशोभीकरण करीत पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. ‘गारबेज व्हेरिएबल पॉईंट’ विकसित केले. स्वच्छता साक्षरता सहलीचे आयोजन केले. शहरातील भिंती स्वच्छतेचे संदेश देत रंगवल्या. स्वच्छता महाभोंडल्याचे आयोजन, स्मार्ट श्रीमती स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेतून जनजागृती, वृक्षारोपण, अर्थसंकल्पात पर्यावरणपूरकतेला प्राधान्य दिल्याने देशात १० व्या क्रमांकावर इंदापूर नगरपरिषद पोहचली असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगीतले.

नगरपरिषदेने इंदापूर महाविद्यालयाशी करार करून स्वच्छता सर्वेक्षणात सहभागी करून घेतले. इंदापुर महाविद्यालयाने बायोकल्चर विकसित करून जादुई टोकरी तयार केली. यासारखे उपक्रम राबवून स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर ही संकल्पना उत्तम पद्धतीने राबवली. या सर्व कार्याची दखल घेऊन स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये इंदापूर नगरपरिषदेस राष्ट्रीय पातळीवर पहिल्या दहा मध्ये येण्याचा मान मिळाला. तसेच ३ स्टार मानांकनाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट शहराचा आणि हगणदारी मुक्तीचा ‘ओडीएफ प्लस’ दर्जा मिळवल्याने इंदापूर नगरपरिषद या सन्मानास पात्र ठरली.

आरोग्यविषयक वृत्त –