इंदापूरात घरफोड्याचे सत्र थांबता थांबेना; आंबेडकर नगरमध्ये रात्रीत 5 ठिकाणी घरफोड्या

इंदापूर : इंदापूर शहर व परिसरामध्ये सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने स्थानिक पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. मागील दीड ते दोन महिन्यापूर्वी अंबीकानगर येथील हायवे रोडलगत अनेक व्यापारी गाळ्याचे शटर उचकटुन त्यातील ऐवजावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता.तर सावतामाळीनगर परिसरातही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटना ताज्या असतानाच आंबेडकरनगर येथेही अशाच प्रकारे घरफोडीची घटना घडल्याने या घटनांचा छडा लावणे पोलीस प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.तर नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

याबाबत श्रीमती सुनंदा भिमराव ओव्हळ (वय ५०) रा.आंबेडकरनगर इंदापूर, जि.पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की फीर्यादी रहात असलेल्या घराशेजारी त्यांचा भाऊ गौतम सदाशिव मखरे याचे घर आहे.परंतु गौतम मखरे हे नोकरीनिमित्त बाहेरगावी सासवड येथे वास्तव्यास असुन त्यांच्या रिकाम्या घराचा वापर फीर्यादी यांच सामान ठेवण्यासाठी करत आहेत.गुरूवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते, दिनांक.५ फेब्रुवारी सकाळी ७ वा.चे दरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने फीर्यादी यांनी सामान ठेवलेले गौतम मखरे यांचे घराचे कुलुप तोडुन घरातील एकुण ३५ हजार ५०० रू.किमतीच्या मौल्यवान वस्तु दागीने व रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फीर्यादीत नमुद केले आहे.

यामध्ये १५ हजार रू.किमतीचे,पाच ग्रॅमचे कानातील सोन्याचे वेल,१५ हजार.रू.किमतीचे, पाच ग्रॅमचे कानातील सोन्याचे दोन झुबे,३ हजार ५०० रू.किमतीचे पायातील चांदीचे पैंजण,व रोख रक्कम २ हजार रूपये असे एकुण ३५ हजार ५०० रू.किमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कमेची चोरी झाल्याचे म्हटले आहे.तर त्याच दरम्यान रविंद्र महादेव भंडलकर (वय ३१) रामोशी गल्ली,इंदापूर, सिंधु पंडीत मखरे (वय३७), तानाजी राजाराम मखरे, हणुमंत मारूती ठोकळे सर्व रा. आंबेडकरनगर यांचेही घरी चोरी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले असुन घरफोडीचा गुन्हा इंदापूर पोलीस दप्तरी नोंद झाला असुन पुढील तपास हेड.काँस्टेबल ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव हे करत आहेत.

मागील एक ते दीड वर्षामध्ये इंदापूर शहर व परिसरात रात्री अपरात्री अनेक ठीकाणी घडलेल्या घरफोडीच्या घटना,उच्चभ्रु व हाय सोसायटीमधील बंद फ्लॅटमध्ये वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटना, शहरातील वाहन चोर्‍या, मोबाईल चोर्‍या अशा आनेक प्रकारच्या घटनामध्ये वारंवार वाढ होताना दिसुन येत आहे. परंतु घडलेल्या घटनांचा छडा लावण्यात इंदापूर पोलीसांना म्हणावे तसे यश मीळत नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

तर इंदापूर शहर व परिसरामध्ये रात्रीच्या वेळी पोलीसांची गस्त वाढविणे गरजेचे असुन, शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेर्‍याची सोय व्हावी, रात्रीच्या वेळी फटाके फोडणे, वाढदिवस साजरे करणे, कामाशिवाय रात्री अपरात्री मोकार फिरणार्‍या रिकामटेकड्यांवर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा. रोडरोमीओंच्या टवाळखोरीला आळा घालण्यात यावा, हाॅटेल ढाब्यावर विक्री होत असलेली अवैध दारू, गुटखा विक्रीवर कारवाई व शासनाच्या नियमापेक्षा रात्री जास्तवेळ हाॅटेल, ढाबे उघडे ठेवणार्‍यां हाॅटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्यास अनैतीक धंदे व चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे .