Indapur News : आश्रमशाळांचे प्रलंबित व चालू परिपोषण आहार अनुदान शासनाकडुन त्वरित मिळावे : रत्नाकर मखरे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आश्रमशाळांचे प्रलंबित व चालू परिपोषण आहार अनुदान शासनाकडुन त्वरित मिळावे, आश्रमशाळांकडे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने अडचणी निर्माण होत असुन सदर आवश्यक स्टाफ पूर्ण क्षमतेने भरावा व त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासनास परवानगी मीळावी यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

निवेदनात म्हटले आहे की इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या व स्वयंसेवी संस्थांमार्फत शासन मान्यता प्राप्त अनुदानित भटक्या जाती-जमातीच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालवल्या जातात. त्याच धर्तीवर इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह हे शासनाच्या धेय्य धोरणानुसार सूरू असताना प्रशासनाकडून माझ्या आश्रमशाळांना नेहमीच सापत्नवाची वागणूक मिळत असल्याचे म्हटले आहे.

शिव, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक असून त्यांना अभिप्रेत असलेल्या विजाभज, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा. त्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय व्हावी या हेतूने मी मागील २९-३० वर्षापासून संस्था उत्कृष्ठपणे सांभाळत आहे. परंतु प्रशासनातील अधिकारी विशेषतः सामाजिक न्याय विभागाचे, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी जाणून बुजून मला व माझ्या आश्रमशाळांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.आश्रमशाळा संबंधी विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत असतो.तरी माझ्या आश्रमशाळांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे रत्नाकर मखरे यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.