Pune News : पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द कबड्डी संघावर शोककळा, भीषण अपघातात 2 कबड्डीपटू ठार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कबड्डी स्पर्धेसाठी निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या भरधाव तवेरा गाडीने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. तर 7 जण गंभीर जखमी झाले. विजापूर रस्त्यावर बुधवारी (दि. 17) सकाळी पावणे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना विजापूर मधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

महादेव आवटे (रा.भवानीनगर ता. इंदापूर) आणि सोहेल सय्यद (रा. कळंब ता. इंदापूर) असे अपघातात ठार झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब (ता. इंदापूर) येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात प्रसिद्ध असून हा संघ बुधवारी कर्नाटकातील विजापूर पासून जवळ असलेल्या बेडगी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला होता. आज पहाटे सर्व खेळाडू भवानीनगर व कळंब येथून सोलापूर रस्त्याने तवेरा गाडीने रवाना झाले. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास विजापूर रस्त्यावर कंटेनरशी तवेरा गाडीची धडक झाल्याने यात 9 जण जखमी झाले. त्यात महादेव आवटे आणि सोहेल सय्यद हे दोघे जागीच ठार झाले. तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान महाराणा कबड्डी संघातील महादेव आवटे हा खेळाडू दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन होता व कबड्डीपटूंना प्रशिक्षण देत होता. त्याला पोलीस बनायचे होते मात्र त्याचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.