मृत मित्राच्या कुटुंबीयांना वर्गमित्रांकडून आर्थिक मदतीचा हात

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं असं आपण अनेकदा ऐकतो. पण ते सार्थ ठरवणारी मैत्री इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयाच्या सन १९९६ च्या इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांनी मनोभावे जपली असून नुकतेच अकाली निधन झालेल्या वर्गमित्र कडबनवाडी (ता.इंदापूर) येथील हिरालाल सोमनाथ मंजुळकर या मित्राच्या कुंटुंबीयांना व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून आवाहन करून आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

कडबनवाडी येथील मंजुळकर कुंटुंबातील हिरालाल हा घरातील एकुलता कर्ता होता. त्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. परंतु मैत्रीचे नात संवेदनशील असतं, निस्वार्थ आणी त्यागाचं असे म्हणतात… पण अशीच मैत्री जपणारे शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयाच्या सन १९९६ साली दहावी मध्ये एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या सर्व मित्रांनी व्हाट्सअप ग्रूपच्या माध्यमातून हिरालाल मंजुळकर यांच्या कुंटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद देत वर्ग मित्रांनी एकत्रित येत त्यांच्या कुटुंबास ४०१००/- एवढी आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली.

रविवार (दि १) रोजी हिरालाल मंजुळकर यांच्या कडबनवाडी येथील निवासस्थानी वर्गमित्राने जावून मृत मित्राची पत्नी संगीता मंजुळकर यांच्या कडे धनादेश दिला. यावेळी आई रुक्मिणी मंजुळकर, मुलगा पृथ्वीराज मंजुळकर, मुलगी प्रगती व प्रतीक्षा तसेच वर्गमित्र सुभाष दुधाळ, आ.यशवंत माने यांचे स्वीय सहाय्यक व पत्रकार संतोष ननवरे, महादेव मोहिते, दत्ता साळवे, अनिल जाधव, संतोष चावले सह अन्य मित्र उपस्थित होते.