Pune : लोणी देवकर MIDC तील कंपनीतून 7.5 लाखांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त, इंदापूर पोलिसांची कारवाई

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन – लोणी देवकर (ता. इंदापूर) एमआयडीसीत ऑक्सिजन सिलेंडरचा अवैध साठा असलेल्या कंपनीवर छापा टाकून इंदापूर पोलिसांनी 7 लाख 55 हजार 700 रुपयांचा ऑक्सिजन साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. हा ऑक्सिजन साठा हा संबधित कंपनीने सिलेंडर टाकीत साठवल्याचे स्पष्ट झाले असून ऑक्सिजन भरलेल्या 51 सिलेंडर व 21 रिकाम्या टाक्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एमआयडीसीमधील वाय. आक्सिस स्ट्रक्चरल स्टिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सोमवारी (दि. 26) रात्री आठच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून इंदापूरचे प्रभारी पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास लोणी देवकर एमआयडीसीत ऑक्सिजन सिलेंडरचा अवैध साठा असलेल्या कंपनीवर छापा टाकला. तपासणीत कंपनीत अवैध ऑक्सिजनचा अवैध साठा आढळला. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता कंपनीत एकूण 179 ऑक्सिजन सिलेंडरची आवक झाली असून त्यात 1 हजार 253 क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन असल्याचे समोर आले. कारवाईत पोलिसांनी 7 लाख 55 हजार 700 रूपये किमतीचा ऑक्सिजन साठा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह दिपक पालखे, मोहम्मद अली मड्डी, अमोल गारूडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांचे पथकाने ही कारवाई केली. इंदापूर पोलीस तपास करत आहेत.