नरसिंहपूरातील गावगुंड वाळुतस्करांचा बंदोबस्त करण्याची सरपंच व उपसरपंचाची मागणी

इंदापूर : सुधाकर बोराटे – मौजे नरसिंहपूर येथिल वाळु तस्कर व गावपातळीवरील गंभिर गुन्ह्यातील गावगुंड अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे व संजय रामदास गोडसे (सर्व रा. नरसिंहपूर ता. इंदापूर) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचे गावातील दहशतीमुळे नरसिंहपूर व परिसरातील वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थ व महीला भगीनी यांना दहशतीच्या तणावाखाली वावरावे लागत आहे. गावातील महीलांना त्रास देणारे गावगुंड व वाळु तस्करांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नरसिंहपूर गावचे सरपंच कांचन लक्ष्मिकांत डिंगरे व उपसरपंच दत्तात्रय महादेव ताटे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नरसिंहपूर ग्रामस्थ व महिला यांच्या सह्या असुन याबाबत इंदापूर पोलीस कोणती भुमिका घेणार याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागुन राहिले आहे.

मंगळवार (दि.७) जानेवारी रोजी वाळु तस्करी करताना नरसिंहपूर गावातील ग्रामस्थ दत्तात्रय बबन कोळी व त्यांचे संपूर्ण कुटुंबाला वरील गुंडांनी कशाचीही तमा न बाळगता पहाटेच्या वेळी घरात घुसून तलवार, जंब्या, लोखंडी राॅड, दगड इत्यादी जीवघेण्या हत्याराने अमाणूषपणे मारहाण करून संपूर्ण गाव परिसरामध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न होता. यामध्ये फिर्यादीसह त्याची पत्नी, मुलगा व अपंग असणार्‍या आईलासुद्धा या गावगुंडानी तलवारीच्या उलट्या दांड्याने मारहान करून गंभिर जखमी केले आहे. सदरच्या गंभिर गुन्ह्यातील वरील सर्व आरोपीं खुले आम फिरत असुन आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नसल्याचे अविर्भावात हे गावगुंड गावात खुलेआम वावरत असल्याने गावातील महिलांमध्ये सध्या भितीदायक व दहशतमय वातावरण आहे.

नरसिंहपूर गावामध्ये वाळु तस्करीतुन मोठे गावगुंड तयार झाले आहेत. या गावगुंडाच्या माध्यमातुन गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. यामुळे गावातील गोरगरीब महिलांना गावातील रस्त्यावर मोकळा श्वास घेणे अवघड होत असल्याने नरसिंहपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कांचन लक्ष्मिकांत डिंगरे व उपसरपंच दत्तात्रय महादेव ताटे व सर्व ग्रामस्थ यांचे वतीने गावगुंडाच्या दहशतीपासुन गावाला मुक्त करण्यासाठी गावगुंडाचा बंदोबस्त करण्याची गरज असुन सदर गुंडाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी इंदापूर पोलीसांकडे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

कोळी कुटुंबाला मारहाण करण्याची घटणा घडून आठ दिवस उलटले तरी पोलीसांकडून आरोपींना अटक होत नसल्याने सदर गावगुंड गावात खुलेआम फिरत आहेत. त्यांचेपासुन कुंटुबाला आणखीन धोका होण्याची शक्यता असल्याने इंदापूर पोलीसांकडून पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळण्याची विनंती करणारा अर्ज सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे यांचेकडे दत्तात्रय बबन कोळी यांनी समक्ष भेट घेवुन दीला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असुन न्याय न मिळाल्यास लवकरच ग्रामस्थांसह इंदापूर पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलण करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरूण कोळी, पूणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, भिम शक्ती संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष युवराजमामा पोळ, युवा क्रांती प्रतिष्ठाण अध्यक्ष प्रशांत सिताप, युवानेते प्रशांत उंबरे, दादा कोळी, अण्णा कोळी यांचेसह मोठ्याप्रमाणात नरसिंहपूर ग्रामस्थ उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/