भारताचा ९२ धावात खुर्दा ; न्यूझीलंडविरुद्ध दुसरी निचांकी धावसंख्या

हॅमिल्टन : वृत्तसंस्था – सर्वोत्तम फलंदाजी असलेल्या आणि सुरूवातीचे तीनही सामने खिशात घातल्याने बिनधास्त झालेल्या भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. भारताचा डाव अवघ्या ९२ धावात आटोपला. न्यूझीलंडविरुद्ध ही भारताची दुसरी निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१० मध्ये भारताचा सर्व डाव ८८ धावात तंबूत परतला होता़ यजुर्वेद चहल १८, हार्दिक पड्या १६ आणि कुलदीप यादव १५ या तळाच्या फलंदाजांमुळे भारत ९२ धावांपर्यंत पोहचू शकला.

सामन्याला सुरुवात होताच रडतखडत झाली़ सुरुवातीपासून भारतीय संघ अडचणीत आला होता़ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत फलंदाज केवळ हजेरी लावून जात होते़ केवळ १२ षटकात ३३ धावांवर भारताचा निम्मा संघ तंबूत परतला़ तेव्हा भारत सर्वात निचांकी धावसंख्येत आटोपणार हे स्पष्ट झाले होते़  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताच्या सलामीच्या पाच फलंदाजांपैकी शिखर धवनच्या १३ धावा या सर्वोत्तम ठरल्या. २००५ नंतर भारतीय संघावर प्रथमच भारतीय संघावर अशी नामुष्की ओढावली आहे. अवघ्या ३१ व्या षटकात भारताचा संपूर्ण संघ ९२ धावात तंबूत परतला़ बोल्टने २१ धावा देत ५ बळी मिळविले.
नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियम्सनने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. २०० वा वन डे सामना खेळणाºया रोहितकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्यावर तो खरा उतरला नाही. ट्रेंट बोल्टने सलामीवीर शिखर धवनला ( १३) माघारी पाठवले आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. रोहितही ( ७) बोल्टच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ट झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा शुबमन गिल ( ९) फार काही चमक दाखवू शकला नाही. अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु ते भोपळाही न फोडता ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर तंबूत परतले. पहिले पाच फलंदाज ३३ धावांवर माघारी परतले. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यात पहिले पाच फलंदाज ३३ धावांवर बाद होण्याची ही नीचांक खेळी ठरली. यापूर्वी २००५ मध्ये बुलावायो येथे न्यूझीलंडने ३४ धावांवर भारताच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us