Jalgaon News : कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लील वर्तन, शिक्षण संस्था चालकाविरुद्ध FIR

जळगाव (Jalgaon)  : पोलीसनामा ऑनलाइन – शैक्षणिक संस्था हस्तांतरणाच्या वादात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून एका तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्षण संस्था चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिग्नेट स्कूलचे संचालक मनिष रमेश कथुरिया (रा. मेहरुण तलाव परिसर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत मनिष कथुरिया याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. हा प्रकार शनिवारी (दि.23) सायंकाळी घडला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन, एमबीएचे शिक्षण असलेली तरुणी शनिवारी डी मार्ट परिसरात मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. तिला भेटून मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेली असता पावणे सहाच्या सुमारास मनिष कथुरिया हा त्याठिकाणी आला व तू कोर्टात आमच्या विरोधात साक्ष दिलेली आहे, ती मागे घे, असे म्हणाला. साक्ष मागे घेणार नसल्याचे सांगितले असता त्याने अश्लील शिवीगाळ करुन अश्लील वर्तन केले.

पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी सुरु असलेल्या बांधकाम मजुरांना पाहून कथुरीया तेथून पळून गेला. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित तरुणी ही कथुरिया याच्या शाळेत पूर्वी शिक्षिका होती. दोन दिवस आधीच या संस्थेच्या विरोधात मनिष कथुरिया याच्या फिर्यादीवरुन विकास परिहार व संजय परिहार (रा. भगीरथ कॉलनी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.