Pandharpur News : पगार मिळत नसल्याने पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे बेमुदत काम आंदोलन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडल्याने व राज्य सरकारकडून वेतन अनुदान न मिळाल्याने पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून (५ जानेवारी) काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तत्पूर्वी, २९ डिसेंबरला नगरपरिषदेच्या कामगार संघटनेने बोंबाबोंब आंदोलन केले होते.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व नगर नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झाले नाहीत.

कोरोनादरम्यान हेच नगरपरिषदेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत होते. पण, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम न दिल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे कर्मचारी नोव्हेंबर, डिसेंबर असे दोन महिन्यांपासून वेतनपासून वंचित राहील आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सहाय्यक वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जमा होण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

काम बंद आंदोलनाचे निवदेन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधना भोसले यांना कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, सरचिटणीस सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, अनिल गोयल, जयंत पवार यांच्या शिष्टमंडळाने दिले.