… हा तर महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय : नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा विजय महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असल्याचे म्हटले आहे. राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड देऊ, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

सांगली महापालिका महापौर- उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले आहेत. याबाबत बोलताना पटोले म्हणाले की, सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असे ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.