कर्नाटक : विधानसभा अध्यक्षांकडून ३ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडल्यानंतरही वेगवान हालचाली घडून येत आहेत. विधानसभा अध्यक्ष के.आर. रमेशकुमार यांनी ३ बंडखोर आमदारांना चालू विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत अपात्र घोषित केले आहे. चालू विधानसभेचा कार्यकाळ २०२३ पर्यंत आहे. याचा अर्थ असा की अपात्र आमदार विधानसभेची पोटनिवडणूक देखील लढवू शकत नाही. वेळेआधीच विधानसभा भंग झाली तरच हे आमदार २०२३ च्या आधी आमदार होऊ शकतात. अपात्र घोषित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये आर. शंकर या अपक्ष आमदाराचाही समावेश आहे. या एका अपक्ष आमदाराशिवाय काँग्रेसचे दोन बंडखोर आमदार मेश जारकिहोली आणि महेश कुमातल्ली यांना देखील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केले आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हटले की, काही दिवसानंतर ते इतर १४ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर देखील निर्णय घेतील. एकूण १७ आमदारांनी कुमारस्वामी सरकारपासून फारकत घेत अध्यक्षांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे दोन दिवसाआधीच कर्नाटकातील सरकार पडले होते.


अध्यक्षांनी दिला नियमांचा दाखला

अपक्ष आमदार आर. शंकर कुमारस्वामी हे कुमारस्वामी सरकारमध्ये निगम प्रशासन मंत्री होते. नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि बंडखोर आमदारांसोबत मुंबईला गेले. आर. शंकर यांनी त्यांचा पक्ष केपीजेपीचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण केले होते. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार म्हणाले की, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदाराला निवडणूक लढवता येत नाही. तसेच सभागृहाचा कालावधी संपेपर्यंत ते विधानसभेसाठी निवडणूक लढवू शकत नाहीत. तिन्ही आमदारांनी स्वतःहून योग्य पद्धतीने राजीनामा दिलेला नाही. म्हणूनच त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवले. कुमार यांनी म्हटले की, या आमदारांनी संविधानातील १० व्या अनुसूचीतील तरतुदीचे उल्लंघन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त