CAA च्या गदारोळा दरम्यान भारतात आले 50 पाकिस्तानी हिंदू कुटूंब, सोबत आणलं ‘बक्कळ’ सामान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधात देशात होणारा गदारोळ अद्याप कमी झालेला नाही, या दरम्यानच पाकिस्तानमधून हिंदुस्थानात येणार्‍या हिंदू कुटुंबांची संख्या वाढली आहे. आता पाकिस्तानमधील जवळपास ५० हिंदू कुटुंबांचा समूह वाघा सीमेमार्गे भारतात आला आहे. तथापि, सर्व २५ दिवसांच्या पर्यटन व्हिसावर भारतात आले आहेत. या कुटुंबांचे म्हणणे आहे की ते गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वारला आले आहेत आणि आता त्यांना परत पाकिस्तानला जायचे नाही.

भारतात आले ५० पाकिस्तानी हिंदू कुटुंब
विशेष म्हणजे सीएए अंतर्गत मोदी सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानात मध्ये राहणाऱ्या गैर मुस्लिम अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची घोषणा केली आहे. तथापि, ३१ डिसेंबर २०१४ पासून भारतात राहणाऱ्यांनाच नागरिकत्व दिले जाईल. सोमवारी हरिद्वारला जाण्याची इच्छा असणार्‍या ५० हिंदू कुटुंबांचा समूह पंजाबच्या अमृतसरमधील वाघा-अटारी सीमेमार्गे भारतात आला.

परत पाकिस्तानात जाण्याची इच्छा नाही
सर्व पाकिस्तानी हिंदू नागरिक २५ दिवसांच्या पर्यटन व्हिसावर भारतात आले आहेत. नियमानुसार व्हिसाची वेळ संपताच त्यांना पुन्हा पाकिस्तानला जावे लागेल. यांमधीलच एक असलेले लक्ष्मण दास म्हणाले की आपल्याला पुन्हा पाकिस्तानात जायचे नाही आणि आम्हाला भारतातच राहायचे आहे. ते म्हणाले, हरिद्वारमधील गंगा स्नानानंतर ते आपल्या भविष्याचा विचार करतील. परदेशी नागरिकांचा व्हिसा संपल्यानंतर कोणत्याही देशात रहाणे हे बेकायदेशीर मानले आहे.

आपल्या सोबत आणले मोठ्या प्रमाणात सामान
संसदेतून सीएए पारित झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी हिंदू नागरिकांची संख्या पर्यटक व्हिसावर भारतात येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. अलीकडे २०० हिंदू कुटुंबे पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आली होती. सोमवारी भारतात आलेली हिंदू कुटुंबे येथे स्थायिक होण्यासाठी आली आहेत हे सांगणे कठीण असले तरी, ते ज्या पद्धतीने आपल्यासमवेत बऱ्याच वस्तू घेऊन आले आहेत ते पाहून व्हिसा संपल्यानंतरही त्यांना भारतातच राहायचे आहे असे चिन्ह दिसत आहेत.