2020 साठी अब्जाधिशांच्या यादीत सामील झाले 40 भारतीय, तर आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत झाली घट

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना साथीमुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठीच त्रासदायक ठरले. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र या परिस्थिती देखील देशात अनेक अब्जावधीश उदयास आले. मंगळवारी जारी झालेल्या एका अहवालानुसार 2020 मध्ये 40 भारतीय अब्जावधिशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. ज्यामुळे आता देशातील अब्जावधीशांची संख्या 177 झाली आहे. तसेच, 177 भारतीय अब्जाधीशांपैकी 60 जण देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आहेत. त्यापाठोपाठ नवी दिल्लीचे 40 अब्जाधीश आणि बंगळुरुचे 22 अब्जाधीश आहेत.

हुरून इंडिया रिच लिस्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी 83 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्ह्णून कायम आहेत. अहवालानुसार अंबानी यांनी आपल्या संपत्तीत 24 टक्क्यांनी वाढ करून जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून गुजरातच्या गौतम अदानीची संपत्ती वेगाने वाढली आहे. 2020 मध्ये अदानीची संपत्ती जवळपास दुप्पट होऊन 32 अब्ज डॉलर्स झाली. भारतात दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याबरोबरच ते जगातील 48 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहे. यासह त्यांचा भाऊ विनोद अडानी यांची संपत्तीही 128 टक्क्यांनी वाढून 9.8 अब्ज डॉलर्स झाली आहे.

अहवालानुसार, आयटी कंपनी एचसीएल (HCL) चे शिव नादर 27 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह भारताचे तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दरम्यान, टेक इंडस्ट्रीच्या अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मागच्या वर्षी वाढ झाली आहे. त्याचबरोबर , Zcaler या सॉफ्टवेअर कंपनीचे जय चौधरी यांची संपत्ती 274 टक्क्यांनी वाढून 13 अब्ज डॉलर्स झाली आहे. बिजू रविंद्रन आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्तीही 100 टक्क्यांनी वाढून 2.8 अब्ज डॉलर झाली आहे. अहवालानुसार, महिंद्रा ग्रुपचे वैविध्यपूर्ण कॉर्पोरेट हाऊसचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्तीही 100 टक्क्यांनी वाढून 2.4 अब्ज डॉलर झाली आहे.

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 मध्ये टेस्लाचा मालक एलोन मस्क टॉपवर आहे. त्याची संपत्ती एका वर्षात 328 टक्क्यांनी वाढून 197 अब्ज डॉलर्स झाली. केवळ एका वर्षात, मस्कची संपत्ती 151 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. हुरुनच्या यादीत असे तीन लोक आहेत, ज्यांनी फक्त एका वर्षात आपली संपत्ती 50 अब्ज डॉलर्सने वाढविली आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि Pinduoduo चे कॉलिन हुआंग यांचा समावेश आहे.

दरम्यान, 2020 मध्ये ज्या लोकांची संपत्ती घटली त्यातील एक म्हणजे पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण. गतवर्षी आचार्य बालकृष्णाची संपत्ती 32 टक्क्यांनी घसरली असून ती 3.6 अब्ज डॉलरवर गेली आहे.