भारताची निराशाजनक सुरुवात, धोनीसह ४ जण १८ धावात बाद

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर पाचव्या वन डेमध्येही भारताची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारताने पहिल्या १० षटकात अवघ्या १८ धावात ४ गडी गमावले आहेत.
पहिले तीनही सामने जिंकल्यानंतर भारताने कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांना चौथ्या सामन्यात विश्रांती दिली होती. पण या सामन्यात फलंदाजी कोसळून भारताचा डाव ९२ धावात आटोपला होता. पाचव्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनामुळे भारत पाचवी आणि अखेरची लढत चांगली देईल असा विश्वास निर्माण झाला होता.  या सामन्यामध्ये विजय शंकर आणि मोहम्मद शमीची संघात पुनरागमन झाले आहे. तर दिनेश कार्तिक, खलील अहमद आणि कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फलंदाजांनी योग्य ठरविला नाही. पाचव्याच षटकात रोहित शर्मा तब्बल १६ चेंडू खेळल्यानंतर २ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिखर धवन (६), शुभम गिल (७) आणि धोनी (१) हे एका पाठोपाठ तंबूत परतले. तेव्हा १० व्या षटकात भारताच्या नावावर फक्त १८ धावा लागल्या होत्या.

अमराती नायडु, विजय शंकर यांनी ही पडझड थांबून ठेवली असून १५ षटकात ३९ धावाच फलकावर लागल्या होत्या. ही जोडी आणि त्यानंतर केदार जाधव, हार्दिक पंड्या या चौघांवर आता भारताची सर्व भिस्त असून ते खेळपट्टीवर किती टिकतात. आणि जर ते ५० षटके खेळू शकले तरच भारताला या पाचव्या सामन्यात काही संधी मिळू शकते. नाही तर चौथ्या सामन्याप्रमाणे या सामन्याचा निर्णयही एकतर्फी लागू शकतो.