भारताने 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घालून चीनला दिले ‘हे’ 5 सक्त संदेश, जाणून घ्या

नवी दिल्ली : लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरील मोठा तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये मंगळवारी लेफ्टनंट जनरल स्तरावरील आणखी एक चर्चा होणार आहे. या चर्चेच्या अगोदर भारत सरकारने ऐतिहासिक पावले उचलत टिक टॉक, यूसी ब्राऊजरसह चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली आहे. चीनसोबत सीमा वादाच्या सुमारे दोन महिन्यानंतर, भारताने हे ठोस पाऊल उचलले आहे. सरकारने चीनच्या मोबाइल अ‍ॅप्सला बाहेरील आणि अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हणत बंदीचा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने चीनच्या ज्या अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे त्यामध्ये टिक-टॉक, कॅम स्कॅनर, शेयरईट, हेलो, विगो व्हिडिओ, युसी ब्राऊजर, क्लब फॅक्टरी, एमआय व्हिडिओ कॉल – झाओमी, विवा व्हिडिओ, वुई चॅट, युसी न्यूज सारखी प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत. ही अ‍ॅप्स बंद होण्याचा अर्थ आता भारतीय यूजर्स या अ‍ॅप्सचा वापर करू शकणार नाहीत.

चीनच्या 59 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी आणण्यामागे एक मोठे कारण आहे. भारत सरकारच्या महिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत वक्तव्यानुसार त्यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, ज्यामध्ये म्हटले होते की, या अ‍ॅप्सचा दुरूपयोग होत आहे. हे अ‍ॅप्स यूजर्सचा डेटा चोरून, तो भारताच्या बाहेर असलेल्या सर्व्हरला अवैध पद्धतीने पाठवला जात आहे. चीनचे ही अनेक अ‍ॅप्स भारताची सुरक्षा आणि अखंडतेसाठी धोका बनली होती. हे पाऊल करोडो भारतीय मोबाइल आणि इंटरनेट यूजर्सच्या हिताचे रक्षण करणार आहे.

पहिला संदेश हा आहे की, जगभरातील देश चायनीज अ‍ॅपच्या विरोधात सावध व्हावेत. म्हणजे चायनीज अ‍ॅपची सवय लावून घेऊ नये. चायनीज अ‍ॅपची नशा आफीमप्रमाणे धोकायदायक आहे. कारण चायनीज अ‍ॅपवर जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुम्हाला चीनपासून कुणीही वाचवू शकत नाही. चायनीज अ‍ॅपवर आरोप आहेत की, या अ‍ॅपद्वारे जमवलेल्या माहितीचा वापर चीनची कम्यूनिस्ट पार्टी करत आहे.

दुसरा हा संदेश देण्याच प्रयत्न केला आहे की, आता ही वेळ आली आहे की, जगभरातील सरकारांनी आपल्या येथे चायनीज अ‍ॅपची तपासणी करावी. हे अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत नाहीत ना, हे तपासावे.

तिसरा संदेश हा आहे की, जर भारत चायनीज अ‍ॅपशिवाय राहू शकतो, तर अमेरिका किंवा युरोपचे देश असे का राहू शकत नाहीत.

चौथा संदेश हा आहे की, या निर्णयाने देश आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीने मदत होईल, कारण देशात टिकटॉकसारखी अ‍ॅप नसतील तर कुणीही भारतीय अशा अ‍ॅपबाबत विचार करणार नाही. तसेच असे अ‍ॅप भारत देखील बनवू शकतो.

पाचवा संदेश हा आहे की, भारताने चीनला सक्त संदेश दिला आहे की, जर त्यांनी देशाच्याविरूद्ध कोणतेही पाऊल उचलले तर त्यांना सैन्य मोर्चासह आर्थिक मोर्च्यावर सुद्धा उत्तर दिले जाईल.

भारताने चीनसह पूर्ण जगाला सष्ट संदेश दिला आहे की, जर कुठल्या देशाने वाईट नजरेने पाहिले तर त्यास जगातील या मोठ्या बाजारात सहभागी होता येणार नाही.