भारताने न्यूझीलंडला ४-१ असे नमविले

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – अमराती नायडु, विजय शंकर आणि हार्दिक पंड्या यांच्या फलंदाजीनंतर गोलदांजांनी केलेल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला २१७ धावात रोखण्यात भारताला यश आले आणि ३५ धावांनी विजय मिळवत ही वनडे मालिका भारताने ४-१ अशी खिशात घातली़. भारताचे २५३ धावांचे आव्हान तसेच अवघड नव्हते. पण, न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. मोठी भागीदारी न करता न्यूझीलंडचे फलंदाज थोड्या थोड्या अंतराने बाद होत गेले. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर वर्चस्व राखणे शक्य झाले.

कुलदीप यादवच्या अनुपस्थित यजुवेंद्र चहलने आपली जबाबदारी ओळखून न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना ४१ धावांमध्ये तंबूचा रस्ता दाखविला. त्याला सामी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २ बळी घेत चांगली साथ दिली.धोनीची चुणूकपाचव्या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये फारशी चुणूक दाखवता आली नाही. पण यष्टीरक्षण करताना मात्र त्याने अद्भूत अशीच कामगिरी केली. भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला असताना कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले.

केदारने ३७ व्या षटकात जेम्स निशामच्या विरोधात पायचीतचे अपील केले. यावेळी पंचांनी हे अपील फेटाळले. धोनीनेही सुरुवातीला अपील केले खरे, पण त्यानंतर तो चेंडू घेण्यासाठी धावला. धोनी चेंडूपर्यंत पोहोचत असताना न्यूझीलंडचे फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धोनीने चतुराई दाखवली आणि चपळतेने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकला. धोनीने नेमके काय आणि कसे केले हे कुणालाही कळले नाही. अखेर तिसऱ्या पंचांना विचारणे करण्यात आले आणि धोनीने निशामला धावबाद केल्याचा निर्णय दिल्या. चांगला सेट झालेला निशाम ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या हातातून सामना निसटला तो शेवटपर्यंत.

त्या अगोदर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या १० षटकात भारताची अवस्था ४ बाद १८ अशी झाली होती. या अवस्थेतून अमराती नायडु आणि विजय शंकर यांनी केलेली ९८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर हार्दिक पंड्याने केलेल्या झंझावती ४५ धावांमुळे भारताने पाचव्या वन डे मध्ये २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे न्यूझीलंडपुढे २५३ धावांचे समाधानकारक आव्हान ठेवता आले.

पाचव्याच षटकात रोहित शर्मा तब्बल १६ चेंडू खेळल्यानंतर २ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिखर धवन (६), शुभम गिल (७) आणि धोनी (१) हे एका पाठोपाठ तंबूत परतले. तेव्हा १० व्या षटकात भारताच्या नावावर फक्त १८ धावा लागल्या होत्या. यावेळी चौथ्या सामन्यातील ९२ धावा पार करतील की नाही अशी शंका क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावून गेली़ मात्र, त्यानंतर अमराती नायडु आणि विजय शंकर यांनी शांत डोक्याने खेळत तब्बल ९८ धावांची भागीदारी करीत भारताला समाधानकारक स्थितीत आणून ठेवले. विजय शंकरने ४५ धावा काढल्या.

त्यानंतर आलेल्या केदार जाधव याने ३४ धावांचे योगदान दिले. जाधवच्या जागी आलेल्या हार्दिक पंड्याने नेहमी प्रमाणे आपल्या बॅटीचा पट्टा फिरवत २२ चेंडूत ४५ धावा फटकाविल्या. पंड्या ४८ व्या षटकात बाद झाल. तेव्हा भारताच्या २४८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर २५२ धावांवर भारताचा डाव आटोपला होता.