Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं 65 वर्षाच्या वरील वृध्द आणि 10 वर्षा खालील मुलांबद्दल केंद्रानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असे पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घरातच रहावे, यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचना भारत सरकारने केली आहे.

याशिवाय केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी काही निर्बंध घालण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेत रुग्ण आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणालाही सवलतीच्या दरात प्रवास करू दिला जाणार नाही. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे आणि बस प्रवास टाळावा यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. 65 वर्षावरील नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील मुलांनी गरजेचे असल्याशिवाय घराबाहेर पडून नये असे सांगण्यात आलं आहे.

बी आणि सी श्रेणीच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी एकआड एक आठवडा कामावर यावं आणि कार्यालयीन उपस्थिती शक्य तितकी कमी रहावी यासाठी प्रयत्न करावेत असेही केंद्र सरकारने कळवलं आहे. फक्त कोरोना प्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.