बॉलिवूड चित्रपटाद्वारेच आता भारत चंद्रावर पोहोचू शकतो, पाकच्या मंत्र्याचं बेताल वक्‍तव्य

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान-2 च्या यशाने बिथरलेले पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन हास्यास्पद टिपण्या करत आहेत. चांद्रयान मोहिमेत भारताने मिळवलेल्या यशाबद्दल जग भारताचे कौतुक करण्यात व्यस्त असताना पाकिस्तानचे मंत्री भारताची खिल्ली उडवण्यात व्यस्त आहेत. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पुन्हा एकदा चांद्रयानावर टिपण्णी करून स्वतःचे हसू करून घेतले आहे. भारत आता बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून फक्त चंद्रावर पोहोचू शकतो असं विधान त्यांनी केलं आहे.

चांद्रयान अवघे 2.1 कि. मी. वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला. यावर पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एक खिल्ली उडवताना ट्विट केले होते की, ‘विक्रम मुंबईत तर उतरला नाही ना. ‘असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही टीका झाली. मात्र त्यांच्यावर केल्या गेलेल्या टीकेचाही त्यांना काही फरक पडला नाही त्यांनी पुन्हा चांद्रयानावर टीका केली आहे, ‘भारत आता फक्त बॉलिवूडच्या माध्यमातून चंद्रावर उतरू शकतो. चित्रपटावर 100 कोटी लावा आणि चंद्रावर पोहोचा असे ते म्हणाले आहेत.

भारताची बेजबाबदार वृत्ती जगासाठी घातक –
मात्र एवढ्यावरच ते थांबले नाही तर चौधरी यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आणि म्हटले आहे की,’ अयशस्वी मोहिमांमुळे अवकाशात कचरा वाढत आहे, जो जगासाठी घातक आहे. आधी मिशन शक्ति फेल झाले होते आता चांद्रयान फेल झाले आहे. मोदी सरकारची अवकाशाच्या बाबतीत असणारी बेजबाबदार वृत्ती जगासाठी घातक आहे.’