जखमी जवानांच्या प्रकृतीत वेगाने होतेय सुधारणा, लष्करी अधिकार्‍यांची माहिती

पोलिसनामा ऑलनाईन – पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चकमकीत भारताचे काही जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लेह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जवानांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराचा कोणताही जवान गंभीररित्या जखमी नाही. सर्व जवानांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. लेह येथील रुग्णालयात आपले 18 जवान उपचार घेत असून येत्या 15 दिवसांमध्ये ते पुन्हा देशसेवेसाठी रूजू होणार आहेत. याव्यतिरिक्त 56 जवानांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते एका आठवड्यात पुन्हा देशसेवेसाठी रुजू होतील, अशी माहितीही अधिकार्‍यांकडून देण्यात आली. दरम्यान, कोणताही जवान चीनच्या ताब्यात नसल्याची माहितीही अधिकार्‍यांकडून देण्यात आली. दरम्यान, गलवान खोर्‍यात जवान शहीद झाले, ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदनादायी आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढलेल्या या जवानांचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. भारतीय लष्कराच्या अत्युच्च परंपरेचे प्रदर्शन करत त्यांनी देशासाठी बलिदान दिले. देश त्यांचे शौर्य आणि बलिदान कधीही विसरणार नाही, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.