चीनकडून भारताच्या सीमेवर 60 हजार सैनिक तैनात, अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्यानं प्रचंड खळबळ

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भारत-चीनसंदर्भात केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. चीनने भारताच्या उत्तर सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केले आहेत, असा दावा माइक पॉम्पिओ यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. यावेळी चीनचा व्यवहार हा बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

माइक पॉम्पिओ यांनी मुलाखत देताना म्हटले की, विस्तारवादी असलेल्या चीनने भारताच्या सीमेजवळ 60 हजार सैनिक तैनात केले आहे. त्यामुळे तणाव निवळणे कठिण आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य असलेल्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या बैठकीत सर्वच देशांचे परराष्ट्रमंत्री भेटले होते. त्या बैठकीवर चीनने टीका केली होती. या टीकेला पॉम्पिओ यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, चीनचा व्यवहार हा बेजबाबदार आणि धोकादायक आहे.

पॉम्पिओ यांनी म्हटले की, क्वाड गटातील देश हे जगातले लोकशाहीवादी देश आहेत. या सर्व देशांना कम्युनिस्ट चीनपासून धोका वाटतो.

दरम्यान, 17 नोव्हेंबरला ब्रिक्स देशांची बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार्‍या या बैठकीत सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रथमच समोरासमोर येणार आहे. दोन देशांतील मागील काही महिन्यांच्या तणावानंतर हे दोन नेते एकाच बैठकीत सहभागी होत असल्याने जगाचे लक्ष या बैठकीकडे असणार आहे.

ब्रिक्स संघटनेत भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सदस्य देश असून 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव असताना या संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी-जिनपिंग नक्की काय बोलणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.