आता इलेक्ट्रीकल क्षेत्रात देखील चीनला मोठा धक्का देणार भारत, मंत्री म्हणाले – ‘आयात करण्याचे नियम करणार कडक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताकडून चीनला सातत्याने आर्थिक धक्के बसत आहेत. रस्ते बांधकाम आणि डिजिटल क्षेत्रानंतर आता वीज क्षेत्राची वेळ आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह म्हणाले की, वीज प्रकल्पासाठी चीनकडून जी आयात केली जात होती, त्यावर आता सरकार नियंत्रण ठेवू शकते. या क्षेत्रात कस्टम ड्युटी वाढवता येऊ शकते.

एका मुलाखतीत आरके सिंह म्हणाले की, सरकारकडून कस्टम ड्युटी वाढवली जाईल, जेणेकरून सहजतेने होणारी आयात आणखी कडक केली जाईल. चिनी कंपन्यांना आळा घालण्यासाठी कस्टमसह नियमही कडक केले जातील.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताकडे अशी शक्ती आहे की आपण चीनला आर्थिक पातळीसह युद्धक्षेत्रातही ढकलू शकतो. आज संपूर्ण जग भारताबरोबर आहे, यात भारताच्या मजबूत नेतृत्वाचा हात आहे.

चिनी गुंतवणूक थांबल्यानंतर भारतावर होणाऱ्या परिणामाबाबत ते म्हणाले की, आपण आपल्या देशातील पुरवठा स्वतःच पूर्ण करू शकतो. पूर्वी मालाची मागणी केली जात होती, कारण चीन आपले उत्पादन स्वस्त दरात देत असे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारताची सुरुवात केली गेली आहे.

आरके सिंह म्हणाले की आता घरगुती वस्तूंवर अवलंबून राहणे वाढेल, कारण चीनला कठोर धडा शिकवण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.

याआधी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केले होते की, आता भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घातली जाईल. एवढेच नाही तर ते कोणाच्या भागीदारीत आल्यासही त्यांच्यावर बंदी घातली जाईल. दुसरीकडे एमएसएमई क्षेत्रातही अधिक कडक नियम करण्यात येतील.

यापूर्वी सरकारने चीनच्या टिकटॉकसह ५९ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्याचबरोबर रेल्वेने चिनी कंपनीला दिलेले कंत्राटही रद्द केले होते.