शरद पवारांच्या ‘त्या’ भूमिकेवर काँग्रेस ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीन प्रश्नी काँग्रेस सरकारसोबत आहे, मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही, तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. 1962 व आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चीन प्रश्नाबाबत मांडलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

45 वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे 20 जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणतात. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. यांचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच पवारांसाहेबांनाही असेल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार ?
भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटीत होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही, असं शरद पवार म्हणाले होते.