भारत-चीन तणाव : … तर भारत कोणत्याही कारवाईला तयार असेल, परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे सार्वभोमत्व आणि प्रादेशिक अखंडता या तत्वांशी कोणतीही तडजोड केली जाईल, अशी आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मग समोर कुणीही असो किंवा परिस्थिती कोणतीही असो भारत आपल्या भूमिकेवर ठामच राहील, असे भारताने स्पष्ट केले आहे. भारत हा नेहमीच मतभेद हे शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत या मताचा देश आहे. मात्र, परिस्थितीनुसार कोणत्याही कारवाईला भारत नेहमी तयार असतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाने आज आपल्या वंदे भारत अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, या पत्रकार परिषदेत भारत-चीन वादावरील प्रश्न मोठ्या संख्ये उपस्थित करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली. आमच्या सर्व सीमांजवळील भागामध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राखण्याचे महत्त्व भारत चांगल्या प्रकारे जाऊन आहे. या सोबतच कोणतेही मतभेद असतील तर ते चर्चेद्वारे सोडवले जावेत या मताचा भारत आहे. मात्र आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुरशित ठेवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे, अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

अनुराग श्रीवास्तव पुढे म्हणाले की, चीन आपल्या सर्व प्रकारच्या कारवाया आणि व्यवहार आपल्या सीमेच्या आतच करेल अशी आम्हाला आशा आहे. भारत आणि चीन या दोन देशांमधील संवाद अद्याप थांबलेला नाही. याच संवादाचा भाग म्हणून गुरुवारी (दि. 18) दोन्ही देशांदरम्यान मेजर जनरल स्तरावरील बैठक झाली. पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या परिस्थिवर मार्ग शोधण्यासाठी दोन्ही देशांची ही बैठक सहा तास चालली. दोन्ही पक्ष बुधवारी भेटले होते, मात्र त्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.