मिलिंद देवारा यांचा काँग्रेसला घरचा आहेर, चीन मुद्यावर केलं मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत आणि चीन मुद्यावरून काँग्रेसकडून मोदी सरकाराला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दररोज नवनवे प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेस भाजपमध्ये वाद सुरु असताना आता त्यामध्ये काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पार्टीला घरचा आहेर दिला आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटवर लिहलं आहे की, एकजूट होऊन काम करण्याच्या काळात राजकीय कुरघोडीमुळे आपला जगात एक तमाशा बनला आहे, देवारा म्हणाले की चीनविरुद्ध संघटित होण्याची गरज आहे.


देवरा यांनी म्हटले आहे की, हे फार दुर्दैवी आहे की, जेव्हा चीनच्या अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय आवाज एकत्र आला पाहिजे, त्या ऐवजी राजकीय चिखल उधळला जात आहे. त्यामुळे आपण जगात एक तमाशा बनलो आहोत. चीन विरुद्ध एक होणे आवश्यक असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हणत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील चीन प्रकरणावरून काँग्रेसला सल्ला दिला होता. राष्ट्रीय सुरक्षेबाबत राजकारण करू नये, असे शरद पवार यांनी म्हटले होते. 1962 मध्ये जे घडलं ते विसरता येणार नाही. आमच्या 45 हजार चौरस किमी क्षेत्रावर चीनने अतिक्रमण केलं होतं. पवार म्हणाले की, सध्या चीनने आपल्या कुठल्या भूमीवर कब्जा केला आहे की नाही हे मला ठाऊक नाही. परंतु त्याविषयी चर्चा करताना आम्हाला भूतकाळ लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. शरद पवार यांची ही प्रतिक्रिया काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या आरोपावर होती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमणामुळे भारतीय क्षेत्र त्यांच्या ताब्यात दिलं आहे असे म्हटलं होतं.