हिंदी महासागरात चीनच्या हालचालींवर ‘वॉच’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – चीनसोबत सुरू असललेल्या वादामुळे भारतीय नौदलाने आता हिंदी महासागरात आपली गस्त वाढवली आहे. या परिसरात पाळत ठेवण्यात येत आहे. हिंदी महासागरातील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी नौदलाने आपली जहाजे तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाने अमेरिकन आणि जपानी नौदलांबरोबर संयुक्त लष्करी अभ्यास केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चिनी वाढत्या कुरापतीमुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागराच्या परिसरात अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ते या भागातील चीनच्या वाढत्या हालचालींवर सतत नजर ठेवून आहे. हिंदी महासागराच्या रणनीतिक जल क्षेत्रामध्ये सुरक्षा ठेवण्यासाठी भारताने या भागात अमेरिका आणि जपानबरोबर मैत्रीपूर्ण नौदल सरावदेखील केला आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रात जपानी नौदलाबरोबर एक मोठा सराव केला. चिनी नौदल जहाजे आणि पाणबुडी या भागात गस्त घालतात. त्यामुळे भारतीय नौदल जहाज आय.एन.एस. राणा आणि आय.एन.एस. कुलिश यांनीही या लष्करी सरावामध्ये भाग घेतला होता. दोन जपानी युद्धनौका जे.एस. काशिमा आणि जे.एस. शिमायुकी यादेखील यामध्ये सामील झाल्या. या देशांमधील नौदल समन्वय आणि सहकार्य वाढवणे हाच या सरावाचा हेतू होता. भारतीय नौदलाने ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नेव्हीबरोबरही सहकार्य वाढवले आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न आणि दक्षिण चीन समुद्र आणि इंडो-पॅसिफिकमध्ये हस्तक्षेप करण्याच्या दरम्यान या लष्करी सराव खूप महत्त्वपूर्ण आहेत.