चीनसोबत झालेल्या ‘हिंसक’ संघर्षानंतर ‘गुप्तचर’ यंत्रणांच्या ‘रडार’वर 52 चायनीज App

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लडाखच्या गलवान खोर्‍यात हिंसक संघर्ष झाल्यानंतर भारताने चीनला धडा शिकवण्याची तयारी केली आहे. चीनला प्रत्येक आघाडीवर धडा शिकवला जाणार आहे. लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल (कंट्रोल) वर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. सोबतच हिंद महासागरमध्ये नौदल आपली ताकद वाढवत आहे. यादरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर चायनीज अ‍ॅप आले आहेत.

सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 52 मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची यादी जारी केली आहे, ज्यांचे कनेक्शन चीनशी आहे. ही यादी एप्रिलमध्येच बनवण्यात आली होती. आता सरकारकडे ही यादी सोपवण्यात आली आहे, जेणेकरून सरकारने हे अ‍ॅप ब्लॉक करावेत किंवा ते डाऊनलोड न करण्याचे आहवान जनतेला करावे.

गुप्तचर यंत्रणांनी आपल्या यादीत जे अ‍ॅप ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूम आणि पॉप्युलर सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकसुद्धा आहे. याशिवाय यूसी ब्राऊजर, शेयरइट, क्लिन-मास्टर सारखी अ‍ॅपसुद्धा आहेत. तसेच शॉपिंग अ‍ॅप शिन आणि फॅक्टरीसुद्धा ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच आता टेलीकॉम मंत्रालयाने बीएसएनएलला चीनी कंपन्यांचा वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने बीएसएनएल निर्देश दिले आहेत की, कामात चीनी कंपन्यांचा उपयोग कमी करावा. जर काही बिडिंग असेल तर त्यावर नव्याने विचार करावा. मात्र, याबाबत टेलिकॉम मंत्रालयाने जीओ सारख्या भारतीय खासगी कंपनीला कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

तसेच, व्यापारी संघटना कॅटने चीनी उत्पादनांवर बहिष्कार आणि भारतीय वस्तुंना चालना देण्यासाठी राष्ट्रीय अभियान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने 500 वस्तूंची यादी तयार केली आहे, ज्या चायनाकडून न मागवण्याचा निर्णय घेतला आहे.