‘या’ कारणामुळं लडाखच्या प्रदेशावर चीनचा ‘वॉच’, ‘इथं’ प्रचंड मोठा खजिना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमधील पैंगोग त्सो या सरोवरानजीकच्या वादग्रस्त भागात काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांचे सैन्य समोरासमोर आले होते आणि या भागात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाणेही केली होती. त्यामुळे त्या विभागात ताणतणाव वाढला असून, चीनचे हजारो सैनिक गलवान भागातील ३ ठिकाणी भारताच्या हद्दीत घुसले आहेत. तसेच चिनी सैनिकांनी पैंगोग सरोवराजवळ फिंगर एरियामध्ये बंकरदेखील बनविण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या या इराद्यामागे फक्त तेथील भूभाग ताब्यात घेणे हाच उद्देश नसून आणखी एका महत्वाच्या कारणामुळे चीन असं कृत्य करत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला.

लडाख मधील गलवान भागात ज्या ठिकाणावरून भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या वादविवाद सुरु आहे. ते गोगरा पोस्टनजीक असलेल्या गोल्डेन माउंटेनमुळे. दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधामुळे या भागात आजतागायत मोठा सर्वे झाला नाही. पण याच भागात सोन्यासह अन्य बहुमूल्य धातूचा साठा असल्याचं बोललं जात आहे. लडाखच्या अनेक भागात उच्च गुणवत्ता असणाऱ्या युरेनिअमचा खजिना आहे. त्यापासून फक्त वीज नव्हे तर अणुबॉम्बही बनवले जाऊ शकते.

येथील डोंगराच्या नमुन्याची चाचणी २००७ साली जर्मनीच्या प्रयोगशाळेत केली होती. तेव्हा त्यात ५.३६ टक्के युरोनिअम सापडलं होत. हे नमुने इतर देशांच्या मिळालेल्या नमुन्यापेक्षा वेगळे होते. लडाख भारतीय आणि एशियाई प्लेटच्या दरम्यान आहे. याच ठिकाणी ५०-६० मिलियन वर्षांपूर्वी दोन्ही प्लेटांच्या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिंती झाली. त्यामुळे लडाखच्या पर्वतामध्ये खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात. या पर्वतांमध्ये युरेनिअमचे साठे सापडले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, युरेनिअमने भरलेला लडाख खडक इतरांपेक्षा खूपच नवीन आहे. साधारण ते १०० ते २५ कोटी वर्ष जुनं आहे. असे युरेनिअम समृद्ध खडक आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये आढळतात. पण ते २५०० ते ३००० मिलियन वर्ष जुने आहेत.

या खडकापासून ०.३१ -५.३६ टक्के पर्यंतचे युरेनिअम आणि ०.७६-१.४३ टक्के पर्यंतचे थोरियम सापडले. हे युरेनिअम कोहिस्तान, लडाख आणि दक्षिण तिबेटपर्यँत विस्तारलेले आहे. दरम्यान, अमेरिकेबरोबर तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी तज्ज्ञांनी अणुबॉम्बची संख्या अनेक पटींनी वाढवून १ हजार करण्याचा सल्ला दिला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन यांनी म्हटलं की, अमेरिकेशी सामोरे जाण्यासाठी चीनला अण्वस्त्रे वाढवून एक हजार करावी लागतील. एका अंदाजानुसार सध्या चीनकडे २६० अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे चीनला १००० अणुबॉम्ब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युरेनिअमची गरज लागणार आहे.