‘त्या’ पत्रकाराच्या बचावात उतरले ‘ग्लोबल टाईम्स’ !

बिजींग : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं फ्रीलांसिंग करणाऱ्या एका पत्रकाराला अटक केल्याची माहिती समोर आली होती. या पत्रकाराकडून देशाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले होतं. राजीव शर्मा असं या पत्रकाराचं नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं त्यांना अटक केली होती. यानंतर आता त्यांच्या बचावासाठी चीनच्या सरकारनं ग्लोबल टाईम्स वृत्तपत्र उतरवले आहे. शर्मांचे लेख ग्लोबल टाईम्समध्ये येणं ही सामान्य बाब असल्याचं संपादक हू शिजीन यांनी म्हटलं आहे. संपादकीयमधून शिजीन यांनी आपली भूमिका मांडली आहे.

शर्मांच्या अटकेनंतर ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाची चर्चा केली जात आहे. भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावात हा अन्यायकारक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील अनेक विचारवंत इंग्रजी भाषेतून विविध मुद्द्यांवर ग्लोबल टाईम्समध्ये लिहित आहेत. जवळपास 10 वर्षांपूर्वी ग्लोबल टाईम्सची इंग्रजी आवृत्ती आल्यानंतर भारतीयांनी ग्लोबल टाईम्समध्ये लिहिणं ही सामान्य बाब झाली आहे. कथित हेरगिरीच्या प्रकरणात ग्लोबल टाईम्सला जोडलं जात असून खळबळ निर्माण केली जात आहे. भारत सरकार आता चीनी माध्यमांवर निशाणा साधत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान राजीव शर्मा यांना 14 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. पत्रकार राजीव हे भारताच्या सीमेवरील रणनीतीची माहिती चीनच्या गुप्तहेरांना देत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राजीव शर्मांना पोलिसांनी ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या दिल्ली स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितलं की, पत्रकार राजीव शर्मा 2016 ते 2018 पर्यंत चीनी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता. अनके देशात शर्मानं चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. राजीव शर्मा सीमेवरील भारतीय लष्कराची तैनाती आणि भारताच्या सीमा रणनीतीबद्दची माहिती चीनी गुप्तचर यंत्रणेला देत होता.

दिल्ली पोलिसांनी असंही सांगितलं की, राजीव शर्माला पत्रकारितेचा जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. तो चीनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये तसेच भारतातील बऱ्याच माध्यम संस्थासह संरक्षण विषायवर लिहित होता.