संरक्षण मंत्री राजनाथ सिंहाची राज्यसभेत गर्जना, म्हणाले – ‘देशाचं शीर झुकू देणार नाही’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भारत चीन तणावासंबंधी सरकारची भूमिका आज राज्यसभेत मांडली. पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत संघर्ष टाळण्याचा हरएक प्रयत्न करत आहे. या वादातून चर्चेतून तोडगा काढायला हवा हे भारताचं ठाम मत आहे असं सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हटलं आहे. चीनकडून दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 1993 आणि 1996 सालच्या कराराचंही उल्लंघन झालं आहे असंही ते म्हणाले आहेत.

राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत असाही पुनरुच्चार केला की, चीननं लडाखमध्ये जवळपास 38 हजार स्केअर किलोमीटर जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळवला आहे. सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळं द्विपक्षीय नात्यावरही परिणाम होणार हे चीननं लक्षात घ्यायला हवं असा चीनला इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला.

राजनाथ सिंह यांनी चीनच्या बाता आणि कृत्य यात फरक असल्याचंही नमूद केलं. याचाच पुरावा म्हणजे चर्चा सुरू असतानाचा चीनकडून 29-30 ऑगस्ट रोजी चिथावणीखोर कारवाई करण्यात आली.

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना साईनो पाकिस्तान बाऊंड्री ॲग्रीमेंटचाही उल्लेख केला. या कराराद्वारे पाकिस्ताननं अवैधरित्या 5180 सक्वेअर किलोमीटर भारतीय जमीन चीनला आंदण दिल्याचंही त्यांनी सांगितलं. चीननं अरुणाचल प्रदेशातही 90 हजार स्क्वेअर किलोमीटर भूमीवर दावा केल्याचंही सिंह यांनी नमूद केलं.