देशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार ‘कोरोना’ संक्रमित, 86 हजार झाले बरे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. देशात गेल्या 24 तासात 80,472 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून 1179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसाआधी 70,589 नवीन कोरोना प्रकरणे आणि 776 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान गेल्या 24 तासात 86,428 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य मांत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 62 लाख 25 हजार इतकी झाली आहे. यापैकी 97,497 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 9 लाख 40 हजार इतकी झाली असून 51 लाख 87 हजार लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच पटीने अधिक आहे. आयसीएमआरच्या मते, 29 सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण 7 कोटी 41 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 11 लाख नमुन्यांची चाचणी काल घेण्यात आली.

मृत्यूच्या दरात घट

दिलासादायक बातमी म्हणजे मृत्यू दर आणि सक्रिय प्रकरणांच्या दरात सतत घट होत आहे. मृत्यू दर कमी होऊन 1.57% झाला आहे. दरम्यान ज्या सक्रिय प्रकरणांवर उपचार सुरु आहे त्यांचा दर देखील कमी होऊन 15% झाला आहे. त्याचबरोबर ठीक होण्याचा दर 83% आहे. भारतात रिकव्हरी दर सातत्याने वाढत आहे. बऱ्याच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हरी दर वाढत आहे.

दरम्यान देशात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 13 लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. देशात या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. भारताचा सक्रिय रुग्णांच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत भारत जगातील दुसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे. मृत्यूच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझील नंतर भारताचा क्रमांक लागतो.