Coronavirus : कोरोना उपचाराच्या नियमांमध्ये मोठा बदल ! 14 नाही आता 10 दिवसात ‘डिस्चार्ज’ मिळणार रूग्णाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे लक्षात घेत आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबतचे नियम बदलले आहेत. मंत्रालयाने आता कोरोना रूग्णांना रुग्णालयात ठेवण्यासाठीची वेळ १४ दिवसांवरून १० दिवस केली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, आता गंभीर प्रकरणातच कोरोना संक्रमित रूग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी आरटी/ पीसीआर करावी लागणार आहे, इतर रुग्णांना १० दिवसातच सुट्टी दिली जाऊ शकते. या रूग्णांची आरटी/ पीसीआर चाचणी केली जाणार नाही.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, जर कोरोनाची लक्षणे दिसल्याच्या १० दिवसानंतर रुग्णाला ३ दिवसापर्यंत ताप आला नाही, तर त्याला आरटी/ पीसीआर चाचणी केल्याशिवाय सुट्टी दिली जाईल. जर कोरोनाची सौम्य लक्षणे असतील, तर त्यांना दोन विभागांत विभागले गेले आहे. पहिला ताप आल्यापासून ३ दिवसांच्या आत ताप बरा झाला आणि पुढील ४ दिवस ऑक्सिजनची आवश्यकता पडली नाही, तर अशा परिस्थितीत लक्षणे दिसून आल्याच्या १० दिवसानंतर आरटी/ पीसीआर चाचणी केल्याशिवाय रुग्णाला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. जर ताप नसेल, श्वास घेण्यास त्रास होत नसेल आणि ऑक्सिजनची आवश्यकता नसेल.

दुसर्‍या प्रकरणात जर ताप तीन दिवसांत गेला नाही आणि ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता पडली, तर अशा रुग्णांना केवळ लक्षणे संपल्यावरच आणि ३ दिवस सतत ऑक्सिजनची आवश्यकता भासली नाही तरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. अशा प्रकरणात देखील डिस्चार्ज देण्यापूर्वी आरटी/ पीसीआर चाचणीची आवश्यकता नाही.

घरी जाणाऱ्या रुग्णांना ७ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागेल
डिस्चार्ज देण्याच्या वेळी रुग्णांना सांगण्यात येईल की, घरी पोहोचल्यानंतरही त्यांना सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. सुधारित गाइडलाइनमध्ये सांगितले गेले आहे, की आरोग्य केंद्रांमध्ये भरती केल्यानंतर जर रुग्णांना तीन दिवस कोरोनाची लक्षणे दिसली नाही, तर पुढील चार दिवस त्यांना सौम्य प्रकरणांमध्ये ठेवले जाईल.