Priyanka Gandhi : ‘मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकललं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल २ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून “जबाबदार कोण?” असं म्हणत काही प्रश्न विचारले आहेत. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत” अशी परिस्थिती असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच “आज, भारताच्या १३० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ११% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ ३ % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण ८३ % घटले.

“कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तसेच, लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे” असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

मोदींना प्रियांका गांधी यांनी विचारलेले हे आहेत तीन प्रश्न…

–  सरकारने देशात कमी लसी देऊन परदेशात अधिक लसी का पाठवल्या?

–  हे सरकार उपलब्ध असल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न का करत आहे? जगातील सर्वात मोठा लस उत्पादक भारत आज इतर देशांकडून लस मागवण्याच्या स्थितीत का आहे?

–  लसीकरणाची संपूर्ण योजना सरकारची गेल्या वर्षी तयार होती, मग जानेवारी २०२१ मध्ये केवळ १ कोटी ६० लाख लसी का मागवल्या गेल्या?