कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं चिंतेत वाढ; मोदी सरकारनं घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी 7 जानेवारीपर्यंत कायम असेल. यापूर्वी सरकाने 31 डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ही बंदी वाढवण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आढळल्यानंतर केंद्र सरकारने ब्रिटनहून भारताकडे येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबरला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी सुरू झाली. हा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत लागू होता. मात्र नव्या स्ट्रेनचा धोका कायम असल्याने बंदीची मर्यादा वाढवली आहे. आता 7 जानेवारीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक बंद राहणार आहे.

संसर्गाची तीव्रता 70 टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिली जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसेच सण साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत.