नेपाळने तिबेटसारखी चूक करु नये, योगींचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी बुधवारी पुन्हा एकदा कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत मिळवण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीची सीमारेषा मानण्यास नकार दिला. काली नदी भारत आणि नेपाळची सीमारेषा निश्चित करते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या भूप्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय असे ओली यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी नव्या नकाशात हे भाग नेपाळमध्ये दाखवले आहेत.

ओली यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. ‘तिबेटने केली ती चूक नेपाळने करु नये’ असे विधान योगींनी केले होते. ‘हा नेपाळच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा प्रकार आहे’ असे ओली म्हणाले. भारताने बनावट काली नदी दाखवून नेपाळचा प्रदेश बळकावला असून तिथे आपले लष्कर तैनात केले आहे. पण हा प्रदेश परत मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मुद्दावर संपूर्ण देश एक आहे. सभागृहात विविध पक्षीयांनी एकजूट दाखवण्याची ही दुर्मिळ बाब आहे असे ओली म्हणाले. ‘तिबेटने केली ती चूक नेपाळने करु नये. भारत आणि नेपाळ दोन वेगळे देश असले तरी त्यांचा आत्मा एक आहे. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक संबंध आहेतच पण पौराणिक दृष्टीने जोडलेले आहेत. नेपाळने हे लक्षात घ्यावे’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यावर ओली यांनी ‘भारताच्या केंद्रीय नेतृत्वाने आदित्यनाथ यांना नेपाळला धमकावण्याची भाषा करु नका, हा सल्ला द्यावा’ असे म्हटले आहे.