Coronavirus : चीनमधून ‘व्हेंटीलेटर’, ‘मास्क’, ‘ग्लोव्हज’सह 21 टन वैद्यकीय वस्तू भारतात पोहचल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी चीनने भारताला मदतीचा हात दिला आहे. चीनकडून भारताला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय वस्तू भारतात पोहचल्या आहेत. एअर इंडियाच्या एका विमानातून 21 टन मेडिकल सामान यामध्ये व्हेंटिलेटर, पीपीई सूट भारतात 4 एप्रिलरोजी भारतात आणण्यात आल्या आहेत. दरम्यान कोरोना संबंधीत मेडिकल साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू देशात पोहचवण्यासाठी प्रवासी विमानांचा वापर करण्यास नागरी विमान वाहतूक महासंचालयाने परवानगी दिली आहे.

कोरोना विरोधात लढण्यासाठी देशातील विविध भागांमध्ये आवश्यक असलेले मेडिकल सामान पोहचवण्यात आले आहे. हे सर्व सामान मोफत लाईफलाईन अंतर्गत 116 कार्गो विमानांच्या मदतीने 161 टन वैद्यकीय सामान देशातील इतर भागात पोहचवण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक एअर इंडियाच्या 46 विमानांचा समावेश आहे. तर एअर इंडियाची सहयोगी विमान कंपनी एलायन्स एअरने 40, इंडियन एअरफोर्सच्या 22, इंडिगोने 6 आणि स्पाईसजेटच्या 2 विमानांमधून हे सामान देशातील इतर भागात पोहचवण्यात आले आहे.

लाईफलाईन फ्लाईट्समधून वितरीत करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये कोरोना संबंधित एंझाइम्स, टेस्टिंग किट, पीपीई, मास्क ग्लोव्हज इत्यादी सामान पोहचवण्यासाठी दिल्ली मुंबई, चेन्नई, कोलकता, हैदराबाद आणि बेंगलुरू येथे हब बनवण्यात आले आहेत. तर गुवाहाटी, दिब्रूगड, अगरताला, आयजल, दिमापूर, इंफाळ, कोयंबटूर, तिरूवनंतपुरम, भुवनेश्वर, रायपूर, रांची, श्रीनगर, लेह, पोर्ट ब्लेअर, कोची, विजयवाडा आणि पणजी यासारख्या शहरांमध्ये वस्तू पाठवल्या जात आहेत.