‘कंगाल’ पाकिस्तानला आणखी एक धक्का ! निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  लंडनमध्ये सुरू असलेल्या निजाम खटल्याचा निकाल भारताच्या बाजून लागल्याने पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. हा खटला भारतानं जिंकल्यानं आता निजामाचा खजिना भारताला मिळणार आहे. दरम्यान, निजमाचा खजिना हातातून निसटल्याने पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. याशिवाय हा खटला लढण्यासाठी भारतानं खर्च केलेल्या एकूण रकमेपैकी ६५ टक्के खर्चदेखील (२६ कोटी रुपये) पाकिस्तानला द्यावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढवले आहे.

निजाम फंड खटल्याचा निकाल लागल्यानंतर ३५ मिलियन पाऊंड्स (३२५ कोटी रुपये) मिळाल्याची माहिती भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासातल्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या ७० वर्षांपासून हा खटला लंडनच्या न्यायालयात सुरू होता. ज्यात निजामाच्या १ मिलियन पाऊंडवर भारतानं दावा असल्याचं सांगितलं होत. दरम्यान, इतक्या वर्षांच्या या कालावधीत लंडनमधल्या एका बँकेत अडकून पडलेल्या या खजिनातल्या संपत्तीचं मूल्य ३५ मिलियन पाऊंड्सवर जाऊन पोहोचलं. निकालानंतर आता ही रक्कम भारताच्या ब्रिटनमधल्या दुतावासाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

दरम्यान, २० सप्टेंबर १९४८ पासून ही रक्कम नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक खात्यात अडकली होती. पाकिस्ताननं या रकमेवर दावा केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयानं भारताच्या आणि मुकर्रम जाह (हैदराबादचा आठवा निजाम) यांच्या बाजूनं निकाल दिला. मुकर्रम आणि त्यांचा लहान भाऊ मुफ्फखम जाह पाकिस्तानविरोधात गेल्या ६ वर्षांपासून लंडन उच्च न्यायालयात खटला लढवत होते.