भारताला मिळालं ‘कोरोना’चं आणखी एक औषध, गोळयांनंतर आता इंजेक्शन देखील आलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या भारतीय औषध कंपन्याना सतत यश मिळत आहे. भारतात आणखी एका कोरोना विषाणूच्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. औषध निर्माता हेटेरो सांगते की, कोविड-१९ च्या उपचारासाठी ते इन्वेस्टीगेशनल अँटीवायरल औषध रेमेडिसिवीर लाँच करणार आहेत. कंपनीने यापूर्वीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीजीसीआयकडून मान्यता घेतली आहे. कोविफॉरच्या नावाने भारतात विक्री केली जाईल.

कोरोना विषाणू महामारीसाठी रामबाण उपाय म्हणून ओळखले जाणारे रेमेडिसिवीरही या महिन्याच्या अखेरीस भारतात पोचणार आहे. डीसीजीआयने अलीकडेच कोरोना रूग्णांच्या इमर्जन्सी केसमध्ये या औषधाच्या वापरास परवानगी दिली होती. डीजीसीआयने भारतीय औषधी कंपनी सिप्ला आणि हेटेरो यांना त्याची निर्मिती व विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, डीजीसीआयने कोरोनाच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या दोन्ही रुग्णांच्या उपचारांमध्ये या औषधाच्या वापरास मान्यता दिली आहे. मात्र हे इंजेक्शन फक्त अशा रुग्णांना दिले जाऊ शकते, ज्यांची स्थिती गंभीर आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता कोविफॉरची मान्यता गेमचेंजर सिद्ध होऊ शकते. कारण त्याच्या क्लिनिकल चाचणीचा निकाल खूप प्रभावी आला आहे. हेटेरोचा दावा आहे की, ते त्वरित हे औषध संपूर्ण देशात उपलब्ध करण्यास तयार आहेत. या कंपनीचा दावा आहे की, कोरोनाचा ‘काळ’ कोविफॉर सिद्ध होऊ शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की, कोविफॉर इंजेक्शन १०० मिलीग्रामच्या वायलमध्ये बाजारात उपलब्ध होईल. हे डॉक्टरांच्या किंवा आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली नसांमध्ये लावावे लागेल.

कोविड-१९ च्या उपचाराची व्याप्ती वाढवण्यासाठी या औषधासाठी कंपनीने अमेरिकेच्या ‘गिलियड सायन्स इंक’सह करार केला आहे. हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीच्या अध्यक्षांच्या मते, कंपनी सध्या देशाची गरज भागवण्यासाठी सज्ज आहे आणि त्यांच्याकडे स्टॉकची कमतरता नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये असे म्हटले आहे की, हे इंजेक्शन फक्त ऑक्सिजनवर असणाऱ्या लोकांसाठीच आहे. हे औषध केवळ आणीबाणीच्या वैद्यकीय स्वरूपात समाविष्ट केले गेले आहे. मूत्रपिंडाचा आजार असणार्‍या रूग्णांना हे इंजेक्शन दिले जाणार नाही. हे गर्भवती महिलांच्या उपचारांमध्ये देखील वापरू नये. १२ वर्षाखालील लोकांच्या उपचारांमध्ये वापरले जाऊ नये. इंजेक्शनच्या रूपात या औषधाचा पहिला डोस दिवसातून २०० मिलिग्रॅम आहे. त्याच्या पाच दिवसानंतर १०० मिलीग्राम दररोज वापरावे.

२९ मे रोजी गिलियड सायन्सेसने रेमेडिसवीरच्या आयात आणि मार्केटिंगसाठी भारतीय औषध नियामक एजन्सी सीडीएससीओला अर्ज केला होता. याला आपत्कालीन वापर प्राधिकरणाअंतर्गत डीसीजीआयने १ जूनला परवानगी दिली होती. ‘रेमेडिसिवीर’ इंजेक्शन एक अँटी व्हायरल इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन SARS आणि MERS-CoV सारख्या आजारांसाठी प्रभावी सिद्ध झाले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला देखील अपेक्षा आहे की, हे औषध कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी सिद्ध होऊ शकते. मात्र हे औषध केवळ आपत्कालीन परिस्थितीतच वापरले जाऊ शकते, असे भारताचे आरोग्य मंत्रालय आणि डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.

हेटेरो आणि सिप्ला व्यतिरिक्त बीडीआर, जुबिलंट, मायलान आणि डीआर रेड्डीज लॅब या चार औषध कंपन्यांनीही भारतात हे इंजेक्शन तयार करण्याची आणि मार्केटिंगची परवानगी मागितली आहे आणि ते सर्वच भारत सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.