भारताने तब्बल 160 कोटी लशींचे बुकिंग करून जगात मारली बाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी भारताने तब्बल १६० कोटी लशींचे बुकिंग करून जगात बाजी मारली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लशीचे डोस बुक करणारा भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर युरोपीयन युनियन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. ३० नोव्हेंबरपर्यंत युरोपीयन युनियनने १५८ कोटी, तर अमेरिकेने १०० कोटींहून अधिक कोरोना लशींचे बुकिंग केले आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर लसीकरणाला मंजुरी मिळेल.

भारताने ‘या’ कंपन्यांशी केला करार

जगभरात ऑक्सफर्ड एस्‍ट्राजेनेकाची लस अंतिम टप्प्यात आहे. जगभरातील अनेक देशांनी या लशीचे १५० कोटी डोस बुकिंग केले आहेत. भारत आणि अमेरिकेने या लशीचे ५०-५० कोटी डोस बुक केले आहेत. त्याशिवाय नोवाव्हॅक्‍सच्या लशीचे १२० कोटी डोससुद्धा बुक करण्यात आले आहेत.

जुलै-ऑगस्ट २०२१ पर्यंत ५० कोटी डोस मिळवण्यासाठी लस निर्मिती कंपन्यांच्या संपर्कात आहे. भारताने रशियन कोरोना लस Sputnik V १० कोटी तर नोवाव्हॅक्‍सच्या लशीच्या १०० कोटी डोससाठी बुकिंग केल्याचे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नोव्हेंबर महिन्यात सांगितले होते.

भारत रशियन लशीचे उत्पादन करणार

स्पुटनिक V ही लस मानवी परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर ९१.४ टक्के प्रभावी ठरली असल्याचा दावा रशियाने केला आहे. या लशीसाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मा यांच्यात करार करण्यात आला असून, भारतात स्पुटनिक V चे वर्षाला १०० मिलियन डोस तयार करण्यात येतील. २०२१ च्या सुरुवातीस या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.